रब्बी पिकांचे नियोजन: योग्य नियोजन भरघोस उत्पादन

रब्बी पिकांचे नियोजन : भारतात रब्बी हंगामाला खूप महत्त्व आहे. कारण या हंगामात देशात थंड आणि कोरडे हवामान असते. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, मका, मटर, मोहरी, कांदा यांसारख्या पिकांसाठी पोषक वातावरण असते. रब्बी हंगाम भारतात ऑक्टोबरपासून ते मार्चपर्यंत असतो. या हंगामात पिकाचे व्यवस्थित नियोजन केले तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात हमखास वाढ होते. त्यासोबतच या हंगामात शेतकरी तृणधान्य व डाळींचेही खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात. योग्य नियोजन आणि पाण्याचा योग्य उपयोग करून कमी खर्चात शाश्वत उत्पादन घेऊ शकतात.

रब्बी हंगामात पिकांची निवड आणि नियोजन कसे करावे?

1. जमिनीची योग्य निवड आणि मशागत

रब्बी पीक हे जमिनीच्या गुणवत्तेनुसार घेतले जाते. जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन रब्बी पिकासाठी फायदेशीर ठरते. जमिनीची मशागत करताना एक वेळेस खोल नांगरणी नंतर वरून 1-2 पाटा फिरवणे आवश्यक आहे. जमिनीत सेंद्रिय खत टाकले असेल तर तुमचे पीक जोमदार येईल.

2. पीकाची योग्य निवड

शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात योग्य पीक निवडणे खूप महत्त्वाचे आहे. पीक असे निवडा की कमी खर्चात आणि कमी पाण्यात भरगोस उत्पन्न देईल.

रब्बी पिकपिकांन विषयी
गहूगहू हे सर्वात जास्त खाल्ले जाणारे तृणधान्य आहे आणि यात खूप उत्तम दर्जाचे प्रकारही आहेत. योग्य प्रकार निवडून तुम्ही गव्हाचे उत्पन्न घेऊ शकता. गव्हासाठी 3-4 वेळा पाणी भरावे लागते. गहू हे थंड आणि कोरड्या हवामानासाठीही अनुकूल असतात.
हरभराबहुतेक शेतकरी रब्बी हंगामात हरभरा पेरणीला महत्त्व देतात. कारण हरभरा हा कमी पाण्यात आणि अल्प उष्णतेतही चांगले उत्पादन देतो. मार्केट भावही चांगला असतो. म्हणून हरभरा रब्बी हंगामात फायदेशीर ठरू शकतो.
कांदाहे पीक रब्बी हंगामात घेतले जाणारे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे. या पिकासाठी योग्य फवारणी आणि पाण्याची व्यवस्था करणे महत्वाचे आहे. कांद्याला बाजारातील मागणी पाहता हा भरगोस उत्पन्न देणारे पीक आहे.
मोहरीरब्बी हंगामात तेलबिया पीकाची निवड ही योग्य आहे; या पिकासाठी थंड हवामान लागते, थंड हवामानात मोहरीची निवड अधिक योग्य आहे.

3. बियाण्याची योग्य निवड आणि त्यांच्यावर प्रक्रिया

बियाणे निवडताना ज्या बियाणांची उगमशक्ती ही 80% पेक्षा जास्त असलेल्या बियांची अचूक निवड करणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी थायरम, कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम यांसारख्या बुरशीनाशकांचा वापर करून बियाणे संरक्षित करावीत. मग नंतर शेतात त्यांची पेरणी करावी, जेणेकरून पेरलेल्या बियाण्यांची मर होणार नाही.

हे पण वाचा – रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती

पेरणीचे योग्य नियोजन कसे करावे

1. पेरणी करण्याचा योग्य कालावधी

शेतकरी बांधवानो, रब्बी हंगामात लवकर पेरणी केल्याने पीक उत्पन्नात भरघोस वाढ दिसते. गहू आणि हरभऱ्यासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. बांधवानो, उशिरा पेरणी केल्यास उत्पन्नात घट दिसून येते.

2. गहू आणि हरभरा पेरणीची योग्य पद्धत

शेतकरी बांधवानो, रब्बी हंगामात पेरणीची योग्य पद्धत वापरली तर याचा फायदा हमखास उत्पन्नात पाहायला मिळेल. योग्य अंतर ठेवून पेरणी करणे महत्वाचे आहे. स्वयंचलित बीजण यंत्राचा वापर केल्याने वेळ आणि खर्चही वाचतो.

  • गहू :- गहूची पेरणी करताना ओळींमधील अंतर हे 20-25 सेमी असणे आवश्यक आहे.
  • हरभरा :- हरभराची पेरणी करताना ओळींमधील अंतर हे 30-35 सेमी असणे आवश्यक आहे.

पाण्याचे योग्य नियोजन कसे करावे

रब्बी हंगामात घेण्यात येणारी पिके ही पाण्यावर जास्त अवलंबून असतात. प्रत्येक पिकाला योग्य पाणी दिले गेले पाहिजे यासाठी तुम्ही ड्रीप, स्मार्ट सिंचन प्रणालीचा वापर करून पाण्याचे व्यवस्थापन करू शकता. पिकांना 3-4 वेळा पाणी भरण्यासाठी गरज असते.

गहू पिकाला पहिले पाणी हे गहू पेरल्यावर लगेच द्यावे लागते, नंतर त्याच्या वाढीसाठी आणि त्यानंतर गव्हाचे दाणे भरताना पाणी भरावे लागते. त्याचप्रमाणे हरभऱ्याला ही 2-3 वेळा पाणी भरण्याची गरज असते. यासाठी योग्य टप्पे करून पाणी भरावे लागते.

शेतात खताचे योग्य नियोजन कसे करावे

1. शेतात रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय खातांना प्राधान्य दिल्याने तुमच्या शेतातील मातीची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते.

2. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करावा जेणेकरून मातीची गुणवत्ता घटणार नाही. यासाठी तुम्ही नत्र (Nitrogen), स्फुरद (Phosphorus), व पालाश (Potassium)चे योग्य प्रमाणात वापरू शकता.

  • गहूसाठी तुम्ही 120:60:40 किग्रॅ/हेक्टरी वापरू शकता.
  • हरभऱ्यासाठी तुम्ही 20:40:20 किग्रॅ/हेक्टरी वापरू शकता.

3. तुमच्या खतांच्या नियोजनात झिंक, सल्फर व बोरोन सारखे मायक्रोन्यूट्रिएंट्स वापरल्याने तुमच्या उत्पादनाची हमखास वाढ होईल.

पिकांचे संरक्षण कसे करावे

1. जास्त करून हरभरा पिकावर “चणा खवले किडीचा” प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी शेतकरी बांधव इमामेक्टिन बेंझोएटचा वापर करून त्या रोगावर नियंत्रण मिळवू शकतात.

2. गव्हावर “करपा रोग” होण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर बुरशीनाशक फवारणी करणे आवश्यक आहे.

3. हरभरा आणि गव्हावर पडणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फेरोमोन सापळे आणि जैविक नियंत्रण यांचा वापर करू शकता.

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

1. वेळेची आणि खर्चाची बचत करण्यासाठी शेतकरी बांधवांनी ड्रोन फवारणी यंत्र शेतात वापरले पाहिजे. उंच, मोठ्या आणि दाट पिकांवर फवारणी करणे खूप सोपे होते आणि पिकांना एकसमान पद्धतीने फवारणी केली जाते. यामुळे शेतकरी बांधवांच्या वेळेची बचत होते आणि मजुरीतही ही बचत होते.

2. शेतकऱ्यांनी सिंचन पद्धतीत बदल करायला पाहिजे. ठिबक सिंचन (Drip Irrigation) आणि तुषार सिंचन (Sprinkler Irrigation) या सारख्या सिंचन पद्धती वापरून कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळवू शकतात.

आता सध्या शेतकरी आपल्या शेतात मोबाईल अॅप्स किंवा IoT आधारित यंत्रणांचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे दूर ठिकाणाहून सुद्धा सिंचन प्रणाली हाताळू शकतात. या सुविधांचा वापर केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेलच, पण त्यासोबत पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळेल.

फक्त पिकाला पाणी मिळाल्यामुळे पिकाची वाढ होते, शेतात तण हे जास्त उगवत नाही. ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे, अशा भागांमध्ये ही तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न देणारी शेती करू शकतो.

3. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला जमिनीत असलेल्या पोषक घटकांचा अंदाज लागतो, जेणेकरून तुम्ही अतिरिक्त खतांचा वापर टाळू शकता. रासायनिक खतांचा कमी वापर केल्याने जमिनीची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. योग्य प्रमाणात खत वापरल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होतेच, पण शेतीसाठी लागणाऱ्या खर्चातही बचत होते.

टीप

अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क साधा.

Leave a Comment