ऊसावर येणाऱ्या तुराची कारणे आणि उपाययोजना

आज आपण ऊसावर येणाऱ्या तुराची कारणे आणि त्यावर उपाययोजना सविस्तर पाहू या. तुरा आल्यानंतर ऊसाची वाढ होणे पूर्णपणे थांबते, आणि जर शेतात काही महिने ऊस तसाच राहिला, तर त्याचा परिणाम हा येणाऱ्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे ऊसातील साखर कमी होऊन ग्लुकोज व फ्रुक्‍टोजमध्ये त्याचे रूपांतर होण्यास सुरवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील ऊस पोकळ होण्याच्या अगोदर त्याची तोडणी ही वेळेवर करणे आवश्यक आहे.

ऊस पिकाला तुरा येण्याची कारणे (Reasons for Sugarcane Flowering)

पीक झाड म्हंटल म्हणजे त्याला तुरा (फुले) येतात, ही जैविक प्रक्रिया आहे. ऊसाच्या शेंड्यावर फुलांच्या स्वरूपात तुरा हा लागत असतो. ऊसामध्ये तुरा हा येतोच, पण शेतकरी बांधवांनी वापरलेल्या जातीनुसार तुरा येण्याचे प्रमाण कमी-जास्त असते. मग त्यात काही कारणे ही कारणीभूत ठरतात. चला तर आपण पाहू या ती कोणती कारणे असू शकतात.

1. हवामानात बदल (Weather Changes)

हवामानात होणाऱ्या बदलामुळे तुरा येण्याची शक्यता वाढते. यात मुख्यतः तापमानात वाढ, थंड वारे, झाडांना सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळणे यामुळे याचा परिणाम हा झाडांची उंची वाढणे किंवा झाडावर तुरा येण्याची दाट शक्यता असते. विभागानुसार ही तुरा येण्याचे प्रमाण कमी-जास्त असते.
            जसे आपण केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश कडे गेलो तर त्या क्षेत्रात ऊसाला तुरा हा जास्त प्रमाणात येतो. आणि आपण उत्तरेकडे जाऊ तसतसा तुरा येण्याचे प्रमाण कमी होते किंवा उशिरा येते.

2. पाण्याची कमतरता (Lack of water)

ऊसाला पाण्याचा योग्य नियोजन केले गेले नाही आणि त्याला पाण्याचा योग्य पुरवठा न मिळाल्यास ऊसाचे झाडे तणावाखाली जातात आणि त्यांना तुरा आणि फुले लागणे सुरू होते. म्हणून ऊसाला योग्य पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. उथळ आणि निचऱ्याच्या शेतातून पाणी जास्त प्रमाणात वाहून गेल्याने ही ऊसाला तुरा लागू शकतो.

3. जमीन निवड (Land selection)

तुरा जास्त कमी प्रमाणात येणे हे निवडलेल्या जमिनीवर सुद्धा अवलंबून असते. शेतातील जमिनीतील पाण्याचं प्रमाण जास्त म्हणजे पांथळ जमीन असेल तर जास्त प्रमाणात तुरा येतो. भारी जमिनीत उशिरा तुरा लागतो तर हलक्या जमिनीत लवकर तुरा येतो.

4. खतांची कमी (Lack of fertilizers)

जमिनीतून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता म्हणजे नायट्रोजन, पोटॅशियम किंवा इतर आवश्यक घटक ऊसाला कमी प्रमाणात मिळत असतील तर याचा परिणाम ऊसाच्या वाढीवर होतो आणि ऊसाला तुरा तयार होतो. जमिनीत नत्र असून जर मुळांद्वारे योग्य प्रमाणात शोषण न केले गेल्यास झाडांना जास्त प्रमाणात तुरा येतो. म्हणून जमिनीत नत्राची कमतरता होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे.

5. ऊसाची वाण (Varietal Selection)

ऊसाला तुरा येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. यात काही वाण आहेत, त्यांना जास्त प्रमाणात तुरा लागत असतो, तर काही वाणांना कमी प्रमाणात तुरा लागत असतो. यासाठी शेतकरी बांधवांनी योग्य वाणाची निवड करणे आवश्यक आहे. जसे की एमएस 10001, व्हीएसआय 8005, को-419, को-7219, को-94012 आणि को-सी-671 या जातींना लवकर तुरा येतो. बाकी ज्या त्या विभागाच्या हवामानानुसार अवलंबून असते. कृषी अधिकारांच्या सल्ल्याने वाणाची योग्य निवड करणे गरजेचे आहे.

6. ऊसाचा हंगाम

पूर्व हंगामात ऊसाची लागवड केली तर नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये उसाला तुरा येतो. तर मे आणि जूनमध्ये लागवड केलेला ऊस ऑगस्ट-सप्टेंबर या काळात कांड्या सुटण्याच्या अवस्थेत असतो. तीन ते चार कांड्या आलेल्या असतात. अशा परिस्थितीत ऊसाला अनुकूल वातावरण मिळाले तर त्याच वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ऊसाला तुरा येऊ शकतो.

7. ऊसाचा कालावधी (Cane period)

जर तुम्ही शेतातील ऊस योग्य वेळी काढला नाही आणि जास्त वेळ शेतात उभा राहू दिला, तर ऊसाचे वय वाढत जाते आणि अशातच ऊसाला तुरा येण्याची शक्यता वाढते. आणि उसामधील साखरेचे प्रमाणही कमी होत जाते. यामुळे उत्पन्नात नुकसान होण्याचे प्रमाण पाहण्यात येते.

तुरावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना

1. वाण निवड (Select Suitable Varieties)

तुरा हा प्रत्येक ऊसाच्या वाणीवर येतो, पण याचे प्रमाण हे कमी-जास्त असते. म्हणून योग्य वाण निवडणे आवश्यक आहे. जसे की को-740, को-7125, को-7527, फुले 265, फुले 09057, को-88121, को-8014 आणि को-86032 यांना तुरा कमी प्रमाणात येतो. म्हणून वाण निवडताना जवळच्या कृषी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणे खूप महत्वाचे आहे.

2. खतांचे योग्य नियोजन

शेतकरी बांधवांनो, शिफारस केलेल्या खतांची मात्रा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस द्यावी. त्यात नायट्रोजन व पोटॅशियमचे खत हे पिकांना योग्य प्रमाणात दिले गेले पाहिजे. जेव्हा ऊसांना तुरा येण्याचा काळ असतो, तेव्हा पोटॅशियम खताचा वापर कधीही फायदेशीर ठरतो. पाण्यात मिश्र करून सुद्धा तुम्ही खते उसाला देऊ शकता.

3. पाण्याचे नियोजन

जर तुमची जमीन पांथळ असेल तर पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाणी साठवून राहणार नाही याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी. उसाला नियमित पाणी देणे आवश्यक आहे, जेणेकरून तुरावर नियंत्रण ठेवता येईल.

4. ऊसाची वेळेवर तोडणी

ऊसावर तूरा दिसत असेल तर वेळेवर तोडणी करून घेणे आवश्यक आहे. तुरा आल्याने ऊसाची वाढ थांबते आणि साखरेचे प्रमाणही कमी होते. म्हणून वेळेवर तोडणी केल्यास होणाऱ्या नुकसाणांपासून वाचू शकतो.

5. ऊसाची काळजी आणि तण नियोजन

वेळेवर जमिनीच्या मातीचे प्रशिक्षण केल्याने ऊसाला योग्य पोषणद्रव्ये दिली जातात. त्यामुळे पिकावर त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल. पिकांमधील तण हे पोषणतत्त्वे शोषून घेतात, त्यामुळे याचा पिकावर परिणाम पाहायला मिळतो. म्हणून शेतातून योग्य वेळी तण काढणे आवश्यक आहे.
            ऊसावरील तुरा वाढीवर आढाघालण्यासाठी काही रसायन फवारणी करू शकता. पण आधी जवळच्या कृषी अधिकार्यांसोबत चर्चा करून करणेआवश्यक आहे.

तुरा आल्याने ऊसावर होणारे परिणाम

ऊसाच्या पिकावर तुरा आल्याने ऊसामधील साखरेचे प्रमाण कमी होत जाते आणि त्याचे रूपांतर ग्लुकोज व फ्रुक्टोजमध्ये होत जाते. त्यामुळे ऊसाचा गाभा पोकळ होत जातो आणि ऊसातील पाण्याचे प्रमाणही कमी होत जाते.

त्या सोबतच तुरा आलेला ऊस योग्य वेळी तोडला गेला नाही तर त्याचा परिणाम येणाऱ्या उत्पन्नावरही होतो. आणि शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.

हे देखील वाचा – आंबा बागेचे नियोजन: अनियमित बहार येण्याची कारणे, संगोपन आणि विशेष काळजी

FAQ Question’s

प्रश्न 1: ऊस पिकाला तुरा येण्याची मुख्य कारणे कोणती?
उत्तर: तुरा येण्यामागे खूप कारणे असू शकतात, जसे की हवामानात बदल होणे, हवेतील आद्रता कमी-जास्त होणे, पाण्याचे नियोजन किंवा पाण्याचा अभाव, जमीन निवड चुकणे, जमिनीत खतांची कमी किंवा शेतातील जमिनीत उपलब्ध नत्राची कमतरता , ऊसाची योग्य वाण निवडणे खूप महत्वाचे आहे, ऊसाचा हंगाम, ऊसाचा कालावधी हे सर्व तुरा येण्यास कारणीभूत असू शकतात.

प्रश्न 2: ऊस पिकाला कमी तुरा येणारे जाती कोणते?
उत्तर: को-740, को-7125, को-7527, फुले 265, फुले 09057, को-88121, को-8014 आणि को-86032 या उसाच्या जातींना तुरा उशिरा किंवा कमी प्रमाणात येतो.

प्रश्न 3: ऊस पिकाला लवकर तुरा येणारे जाती कोणते?
उत्तर: एमएस 10001, व्हीएसआय 8005, को-419, को-7219, को-94012 आणि को.सी-671 या उसाच्या जातींना लवकर तुरा येतो.

प्रश्न 4: ऊसाच्या को-419 आणि को-8014 (महालक्ष्मी) जातीचे वैशिष्ट्य
उत्तर: या वाणीचे ऊस गुळासाठी उत्तम असतात. म्हणून शेतकरी या वाणाची निवड आपल्या शेतासाठी करत असतो.

प्रश्न 5: ऊसाच्या को.एम-88121 (कृष्णा) / को.एम-7714 जातीचे वैशिष्टय
उत्तर: या वाणीचे ऊस पाण्याचा ताण सहन करतात आणि उत्तम खोडवा येतो.

प्रश्न 6: कोल्हापूर भागासाठी योग्य ऊसाची वाण?
उत्तर: को-92005 कोल्हापूर भागासाठी उत्तम आहे आणि या वाणाचे ऊस गुळासाठी उत्तम असतात.

प्रश्न 7: ऊसाच्या को.सी-671, को-94012 (फुले सावित्री), को.व्ही.एस.आय – 9805 जातीचे वैशिष्ट्य
उत्तर: या वाणाचे ऊस अधिक साखर उतारासाठी उत्तम असतात.

Leave a Comment